निफाड/सायखेडा : दारणासांगवी येथे अनेक दिवसांपासून मुक्काम ठोकलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.येथील नामदेव पंढरीनाथ जाधव यांच्या गट नं. २११ या उसाच्या क्षेत्रात काही दिवसांपूर्वी वनविभागाने पिंजरा लावला होता. गोदावरी व दारणा नदीच्या संगमावर हे गाव असल्याने नदीच्या खोऱ्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड क्षेत्र असल्याने अनेकवेळा बिबट्याचे दर्शन होत असे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. काही दिवसांपासून याच परिसरातील अनेक कुत्रे अचानक गायब होत होती तर काही शेतकऱ्यांना शेतात काम करीत असताना बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे बिबट्या या भागात दबा धरून बसल्याची खात्री असल्याने वनविभागाने या भागात पिंजरा लावला होता. गुरुवारी अचानक भक्ष्याच्या शोधात येऊन बिबट्या अलगद जेरबंद झाला. वनविभागाला माहिती कळवताच वनअधिकारी बी.आर. ठाकरे, ए.पी. काळे, वनक्षेत्रपाल व्ही.आर. टेकनर यांनी जेरबंद बिबट्याला ताब्यात घेतले. (वार्ताहर)
दारणा सांगवीत बिबट्या जेरबंद
By admin | Published: October 21, 2016 1:33 AM