आझादनगर : मालेगाव शहरातील यंत्रमाग कारखान्यांमध्ये कामगारांसाठी शौचालये, प्रसाधनगृहे व इतर सुविधा न पुरविणाºया कारखानदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी सिटू संघटनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त विलास गोसावी यांना सादर करण्यात आले.शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग कारखाने आहेत. मात्र या कारखाने मालकांकडून कामगारांसाठी शौचालय, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे कामगारांना वेळोवेळी बाहेर उघड्यावर शौचास जावे लागते. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्यास मदत होत आहे. यंत्रमाग कारखान्यांसाठी बांधकाम परवानगी देतेवेळी अटी-शर्तीमध्ये या सुविधा देणे अनिवार्य असते; परंतु कारखानदारांकडून अशा नियमांकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करून नियमांची पायमल्ली करण्यात येते. मनपाकडूनही याबाबत कधी तपासणी करण्यात येऊन खात्री केली जात नाही. शहरात गतमहिन्यात हगणदारी मुक्त शहर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या. यंत्रमाग कारखाना मालकांंसोबत बैठक घेण्यात आली. परंतु त्यावर काय अंमलबजावणी करण्यात आली याचा आढावाही घेण्यात आला नाही. याबाबत सीटू संघटनेतर्फे मनपाला २७ जानेवारी व ३ मार्च रोजी निवेदन देण्यात आले होते. याबाबत मनपा प्रशासनाने कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही. म्हणून ११ आॅगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे कामगारमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मनपा प्रशासनातर्फे कारखाने मालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येऊन संबंधित कारखान्यांची वीजजोडणी खंडित करण्यात यावी. हगणदारीमुक्त शहराची पाहणी करण्यासाठी येणाºया केंद्रीय समितीला जाब विचारण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. मनपाविरुद्ध तक्रार करण्यात येईल, असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. आंदोलनात सीटूचे कॉम्रेड शफीक अहमद, नवीद अहमद, सलीम अहमद, मालेगाव तालुका सायझिंग कामगार संघटनेचे अशपाक अहमद, अकबर बहादूर पटेल यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मालेगावी कामगारांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 11:53 PM