येवला : शहरातून जाणाऱ्या नगर -मनमाड राज्य मार्ग क्रमांक १०च्या शहर हद्दीत दुभाजकावर टोल कंपनीने हायमास्ट (दिवे) केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असून, गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने शहरातील हे अंधाराचे जाळे कधी फिटणार अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी गंगादरवाजा भागात जेवण करून अंधाराच्या वाटेने पायी शतपावली केल्याने पुन्हा एकदा महामार्गावरील हायमास्ट (दिवे) चर्चेत आले आहेत. संवेदना बोथट झाल्याने शोषिक येवलेकरदेखील सवय झाल्याप्रमाणे ब्र काढायला तयार नाहीत. बीओटी आणि नगरपालिका यांच्यातील तू तू मै मैमुळे येवला नगरपालिका हद्दीतून असणारे हे पथदीप अखेरची घटका मोजत आहेत. नागरिकांची काळजी करणारा कोणी शिल्लक आहे की नाही अशी विचारणा या रस्त्यावरून जाणारे येणारे करीत आहेत. या महामार्गावरून जाताना मुंबईतील मरीन ड्राईव्हचा आभास होतो अशा प्रकारची प्रशंसा येवला भेटीत दिग्गज पार्श्वगायक सुरेश वाडकर, सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी करून गेले. मात्र सध्या रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. दुभाजकांची तात्पुरती डागडुजी गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. महामार्गावर बाभुळगाव शिवार ते येवला रेल्वेस्थानकापर्यंत असलेले दुभाजक अनेक ठिकाणी खराब झाले आहेत. या दुभाजकत १२४ विजेचे खांब आहेत. या खांबाचे दोन्ही बाजूला सोडियमचे दिवे लावलेले आहेत. हल्ली ते लागेनासे झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून दिवे बंदच असतात. तहसील कार्यालयापासून नांदेसर रेल्वे शेवटपर्यंत तर एकही दिवा आपला उजेड पाडत नाही. दिवे खराब झाले की त्याची देखभाल करण्यापोटी दिव्याला सीएफएलचे दिवे लावले जातात. मात्र हा दिवा केवळ शोभेची वस्तू झाले आहेत. विंचूर चौफुली ते आमदार छगन भुजबळ यांचे संपर्क कार्यालयपर्यंतच्या खांबावरील दिवेही अधून मधूनच हजेरी लावतात. विंचुर चौफुली व फत्तेबुरुज नाक्यावरील चौफुलीच्या मध्यभागी हायमास्ट लावून त्यावर सर्व बाजूंना प्रकाश पडावा म्हणून पाच-सहा दिवे दिवसा दिसतात, तर रात्री बंद असतात. मनमाड-नगर मार्गावर प्रचंड वाहतूक असून, पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहात असल्याने सर्व दिवे लागणे आवश्यक आहे. या सर्व पथदीपांच्या देखभालीची जबाबदारी येवले शहाराजवळ असलेल्या टोल नाक्यावरील ठेकेदाराची की येवला पालिकेची हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन तक्रारी केल्या; पण त्याचा काही परिणाम झालाच नाही. आमदार छगन भुजबळ मतदारसंघात नित्यनियमाने यायचे तोपर्यंत दिवे प्रकाशित व्हायचे आता मात्र सध्या दिवे बंद राहात असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. बीओटी तत्वावर झालेला हा रस्ता व त्या रस्त्यावर दिवे लावणेसह देखभाल दुरु स्तीचा खर्च बीओटी प्रशासनाने करायचा आहे.परंतु देखभालीसह वीजिबलाचा खर्च पालिकेने सोसून ही यंत्रणा पालिकेने ताब्यात घ्यावी अशा आशयाचे पत्र बीओटी प्रशासनाने पालिकेला पत्र दिले होते.पालिकेच्या सभेवर नेहमीप्रमाणे मार्गदर्शन मागवून दिव्याबाबत निर्णय घेऊ? अशी भूमिका पालिकेने घेवून हा विषय पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या प्रकरणी नेमका काय करार झाला आहे याची माहिती मागवून निर्णय घेणार असल्याचे ठरले होते. त्यामुळे अंधाराचे झाले फिटेल अशी अपेक्षा होती पण हे अंधाराचे जाळे फिटण्याची चिन्हे वर्षे उलटल्या नंतरिह दिसत नाही. यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल हे देखील अनुत्तरीत आहे. पालिकेवर वीजवितरण कंपनीची सुमारे 1 कोटी रु पयाची वीजिबल थकीत असल्याची माहिती आहे. सन २००७ पासून बीओटी ही राजमार्गावरील यंत्रणा चालवत होती. मतदार संघात मंत्री असताना हे दिवे प्रकाशित असायचे परतू सध्या शासनाच्या टोलबाबतच्या धोरणामुळे सध्या वीजिबल भरणे बीओटीला परवडत नसल्याची माहिती आहे.हा विजेचा बोजा नेमका कोणी सोसायचा या बाबतचा करार काय? नेमके कोणाच्या मनमानीत नागरिकांना वेठीस धरले जात आहे. याचा खुलासा करण्याची तसदी बीओटी अथवा नगरपरिषदेने घ्यावी.पालिकेत आता सत्तांतर झाले आहे. अच्छे दिनाच्या बोलबाल्यात हे दिवे प्रकाशमान व्हावे. या प्रश्नावर नविनर्वाचित लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून अंधाराचे जाळे फेडावे अशी हि अपेक्षा येवलेकरांची आहे.