मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील मालदे शिवारात गिरणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात रविवारी सायंकाळपासून एका खडकावर अडकून बसलेल्या १५ मासेमारांची नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅटस्) लढाऊ वैमानिकांनी सोमवारी दुपारी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितरीत्या सुटका केली. सुमारे १५ तासांपासून अडकून बसलेल्या या मासेमारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल, एसडीआरएफच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न अपुरे ठरल्यानंतर अखेर लष्करी जवानांची मदत घेण्यात आली.
अचानक वाढली पाण्याची पातळी
मालेगाव तालुक्यातील मालदे शिवारातील म्हाडाच्या ११ हजार खोली भागाजवळ असलेल्या गिरणा नदीपात्रात १५ मच्छीमार मासेमारी करण्यासाठी उतरले असता, पूरपाण्याची पातळी अचानक वाढली. त्यातच हे सारे जण अडकले. या मासेमारांनी एका खडकाचा आश्रय घेतला.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाने धाव घेत बचावकार्य सुरू केले, परंतु पाण्याची पातळी वाढल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. त्यानंतर धुळे येथील एसडीआरएफची टीम बोलावण्यात आली.
रविवारी रात्री या जवानांनीही शर्थीचे प्रयत्न केले, परंतु रात्रीचा काळोख आणि वाढत्या पाण्यामुळे प्रयत्न अपुरे ठरले. अखेर बचावकार्य काही काळ थांबविण्यात आले.
संपूर्ण रात्र या मच्छीमारांनी त्या खडकावर जागून काढली. त्यानंतर सोमवारी सकाळी लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.