नाशिक - वीज बचतीसाठी महापालिकेने बीअेाटीवर एलईडी दिवे बसविले खरे, मात्र आता महापालिकेच्या दिव्याखाली अंधार असून अनेक ठिकाणी पथदिवे सुरू न करताच वीज बचत केली जात असल्याचा आरोप गुरुवारी (दि.१४) स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. इतकेच नव्हे तर ९२ हजारापैकी ९० हजार दिवे लावले असून, दोन हजार दिवेच लावले नाहीत, अशी तक्रारदेखील करण्यात आली. त्यामुळे महिनाभरात दिवे न बसविल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सभापती गणेश गीते यांनी दिले.
स्थायी समितीची बैठक गुरुवारी (दि.१४) पार पडली. यावेळी एलईडीच्या स्मार्ट लाईटवरून नगरसेवकांनी तक्रारींचा पाऊस पाडला.
सुधाकर बडगुजर, सलीम शेख, मुकेश शहाणे यांनी संबंधित कंपनीने एलईडी दिव्यांबाबत तक्रारी करताना संबंधित कंपनीकडून दिवे वेळेवर सुरू केले जात नाही. तसेच दिव्यांचा प्रकाश पुरेसा पडत नाही. तसेच ९२ पैकी ९० हजार दिवे बसवून महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप केला. सुधाकर बडगुजर यांनी तर २०१८ मध्ये वीज बचतीसाठी दिवे बसविण्याचे काम देण्यात आले, त्यावेळी विजेचा प्रति युनिट दर ७ रुपये ४२ पैसे होता. आता विजेचे दर १२ रुपये प्रति युनिट १२ रुपये असून, त्यामुळे वीज बचत झाली की वाढली, असा प्रश्न केला. त्यावर अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. यावेळी प्रशांत दिवे, प्रतिभा पवार यांनीही आपल्या प्रभागातील समस्यांबाबत तक्रारी केल्या. दिवाळीच्या आत पथदिव्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश सभापतींनी दिले आहेत.
इन्फो....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानधनावर भरती करण्यात आलेले डॉक्टर्स, वॉर्डबॉय, नर्सेस तसेच डाटा एन्ट्री आॉपरेटर यांना येत्या मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची सूचना सभापती गणेश गीते यांनी केली. आगामी काळात दसरा, दिवाळी असून महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने आणि आगामी निवडणूक पाहता कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे गीते यांनी सांगितले.