घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक टीमने नाशिक, पालघर व ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या दुर्गम खैरेवाडी येथे दोन किमी पायपीट करत येथील महिलांना साडी-चोळी व आषाढी एकादशीचा फराळ दिला. गोरगरीब जनतेतच खरा पांडुरंग शोधायचा असतो, हाच संदेश या निमित्ताने व्यक्त होत आहे.घोटीतील कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी जंगलात दोन किलोमीटर पाई चालत, पावसाळी पाण्याने वाहत असलेले तीन नाले ओलांडून, शासकीय योजनांपासून उपेक्षित दुर्गम खैरेवाडी गाठले. विठोबारायाच्या वेशभूषेत असलेल्या पुरुषोत्तम बोराडे या गिर्यारोहकाच्या हस्ते खैरेवाडीतील आदिवासी भगिनींना साडी-चोळी व फराळाचे वाटप करण्यात आले. गिर्यारोहकांनी टाळ-मृदुंगांच्या गजरात विठोबारायांच्या नामाचा जागर केला. साक्षी आरोटे हिने भक्तिगीते गायली.या उपक्रमात कळसूबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, सुरेश चव्हाण, श्याम अदमाने, डॉ. महेंद्र आडोळे, काळू भोर, जनार्धन दुभाषे, शिवाजी फटांगरे, इंजिनिअर दिप्तेश कुमट, मयूर मराडे, गोकुळ चव्हाण, नितीन भागवत सहभागी झाले होते.