पंचवटी : दिंडोरीरोडने निमाणी बसस्थानकाकडे जाणाऱ्या तसेच दिंडोरी नाक्याकडून विरुद्ध दिशेने म्हसरूळकडे जाणाºया दोन चारचाकी वाहनांची शनिवारी (दि़२१) दुपारी पंचवटी पोलीस ठाण्यासमोर समोरा-समोर धडक झाली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार (एम. एच. ०४, ईएच ४०१) म्हसरूळ बाजूने पंचवटी पोलीस ठाण्यासमोरून जात होती़ यावेळी दिंडोरीनाक्याकडून भरधाव आलेल्या चारचाकी (एमएच १५, डीएम ३१३) व स्विफ्ट यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामुळे झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिक व पोलिसांनी धाव घेत जखमीचालकांना कारबाहेर काढून रुग्णालयात हलविले़ दरम्यान, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, चालकही जखमी झाले आहेत़ यापैकी एक चालक गंभीर असून, त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ अपघातानंतर काही काळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती़ दरम्यान, दिंडोरीरोड, पेठरोड भागात नेहमीच वर्दळ असल्याने वारंवार अपघात होतात. शहराच्या बाहेरून कोणार्कनगर परिसरातून बायपासरोड असतानाही अवजड वाहनेदेखील शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या पंचवटी भागातूनच जातात. त्यामुळे निमाणी, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड, पेठरोड, मेरी-म्हसरूळ या भागांत वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
दिंडोरीरोडवर चारचाकीची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:25 AM