नाशिक - शहरात ठिकठिकाणी असलेल्या कच-याच्या ब्लॅक स्पॉट भोवती राहणा-या नागरिकांना कचरा न टाकण्यासंबंधीचे पत्र देण्याची संकल्पना महापालिकेचे आरोग्य सभापती सतिश कुलकर्णी यांनी प्रत्यक्षात आणली परंतु, ज्यांच्यावर पत्र वाटपाची जबाबदारी सोपविण्यात आली, त्या स्वच्छता निरीक्षकाने ब्लॅक स्पॉट नसतानाही आरोग्य सभापतीच्या घरी पत्र देण्याची कामगिरी बजावली. स्वच्छता निरीक्षकाच्या या कर्तबगारीबद्दल सभापतींनी जाब विचारला आणि ब्लॅक स्पॉट असेल त्याठिकाणीच पत्रवाटपाचे आदेश दिले.महापालिकेच्या आरोग्य समितीची सभा सभापती सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, सभापतींनी कच-याच्या ब्लॅकस्पॉटबद्दल विचारणा केली आणि महापालिकेने नागरिकांच्या प्रबोधनासाठी तयार केलेल्या पत्रांचे वाटप कुठपर्यंत आले, असा सवाल केला. ज्याठिकाणी कच-याचे ब्लॅक स्पॉट आहेत, त्या भोवती राहणा-या सुमारे ५०० नागरिकांना त्यांच्या नावाने पत्र देण्याची संकल्पना सभापतींनी यापूर्वी मांडली होती. या पत्रात नागरिकांना कचरा उघड्यावर न टाकण्याचे आवाहन करतानाच दंडात्मक कारवाईचाही इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, ब्लॅक स्पॉटच्या संख्येनुसार, पत्रांची छपाई करण्यात आली. परंतु, सदर पत्रांचे वाटपच केले गेले नसल्याची बाब सभापतींच्या निदर्शनास आली. त्यावेळी, विभागीय अधिका-यांनी स्वच्छता निरीक्षकांमार्फत सदर पत्रांचे वाटप सुरू असल्याची माहिती दिली. मात्र, सभापतींनी आपल्या जवळ असलेले पत्र दाखवत सदर पत्र हे आपल्या स्वत:च्या घरी स्वच्छता निरीक्षकाने आणून दिल्याचे सांगितले आणि अशा पद्धतीने ब्लॅक स्पॉट नसेल त्याठिकाणीही पत्र वाटप केले जात असेल तर त्याचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित केला. यावेळी संबंधित स्वच्छता निरीक्षकाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
नाशकात सभापतीच्याच दारी, स्वच्छता निरीक्षकाची कर्तबगारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 3:05 PM
महापालिका : ‘ब्लॅक स्पॉट’बाबत सभापतींच्या घरी दिले पत्र
ठळक मुद्देकच-याच्या ब्लॅक स्पॉट भोवती राहणा-या नागरिकांना कचरा न टाकण्यासंबंधीचे पत्र देण्याची संकल्पना पत्रात नागरिकांना कचरा उघड्यावर न टाकण्याचे आवाहन करतानाच दंडात्मक कारवाईचाही इशारा