नाशिक : पंडित राजाभाऊ देव आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा वारसा असलेल्या तिसऱ्या पिढीतील युवा कलाकार सूरमणी शिवानी दसककर यांच्या शास्त्रीय संगीताच्या अभिजात मैफलीचा नाशिककरांनी स्वरानुभव घेतला.रावसाहेब थोरात सभागृहात ख्यातनाम गायक पंडित राजाभाऊ देव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि. १९) देवगांधार संगीत महोत्सवास प्रारंभ झाला. यात अभिजात गायकीचा वारसा असलेल्या शिवानी दसककर यांनी आपल्या कलेच्या अभूतपूर्व आविष्काराचे सादरीकरण करताना राग ललिता गौरीमध्ये प्रीतम सय्या विलंबित बंदिशीत आलाप, बोल आलाप, लयकरी, ताना, बोल ताना, जोड बंदिश या सर्व रागविस्ताराच्या अंगांनी रंग भरले. आर्त आणि भरीव स्वर, तार षड्जाची आलेली अनुभूती, तालाला कटत जाणारी लयकरी, तानांची फेक, प्रचंड दमसासाच्या दमदार ताना या सर्व गोष्टींमुळे राग ललिता गौरीच्या असीम वलयाचा आनंद श्रोत्यांनी घेतला. त्याचप्रमाणे राग मारुबिहागमधील ‘मोहन गिरीधारी’ या रूपकमधील बंदिशीचा रागविस्तार करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर चैती हा ललित प्रकार व मध्यंतरानंतर बागेश्री पंचम हा राग आणि समारोपाच्या भैरवीतील ठुमरीने रसिक श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. तबल्यावर संजय देशपांडे यांनी, तर संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथसंगत केली.
दसककर यांच्या गायनाने ‘देवगांधार’मध्ये रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:13 AM