सिन्नर : तालुक्यातील दातली शिवारात केदारपूर गावात बुधवारी (दि.२) रोजी झालेल्या सीलेंडरच्या स्फोटात श्रीरंग केदार यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर खाक झाले होते. या आगीत केदार कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. संपूर्ण केदार बंधुंचा संसार उघड्यावर आला होता. त्या पार्श्वभूमीवर दातली गावातील ग्रामस्थांची बैठक होवून लोकवर्गणीतून जमा झालेले सव्वा लाख रूपये रोख स्वरूपात केदार यांना सुपूर्द करण्यात आले.बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास दोन गॅस सीलेंडरचा स्फोट होवून या आगीत श्रीरंग केदार, सोमनाथ केदार व प्रकाश केदार यांचे तीन घरे जळून खाक झाली होती. यात घरातील कपडे, धान्य, संसारपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स सर्व वस्तू जळून खाक झाल्या. केदार कुटुंबिय घरात नव्हते. त्यामुळे गॅस सिलिंडर स्फोटामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात संसारपयोगी वस्तू जळाल्याने केदार यांचे नुकसान झाले आहे. गुरूवार (दि.३) रोजी सकाळी अचानक दातली येथील विठ्ठल-रूख्मिनी मंदिरात ग्रामस्थ एकत्र जमा झाले. गावातील सुमारे २०० ते २५० ग्रामस्थांनी बैठक घेवून केदार कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास ग्रामसथांनी प्रतिसाद दिला.
दातली व परिसरातील ग्रामस्थ सरसावले केदार कुटुंबाच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 6:43 PM