पेठ : तालुक्यातील खडकी या दुर्गम पाडयावरील दत्ता बोरसे याने नायब तहसीलदार पदाला गवसणी घालत आईवडिलांचे पांग फेडले आहेत.खडकी ( कुं) ता. पेठ येथील हरी रामा बोरसे व पत्नी देऊबाई हे साधारण 1988 च्या दरम्यान गावी रोजगार नसल्याने मजुरीसाठी नाशिकला स्थलांतरीत झाले. आदिवासी भागातून येणार्या मजूरांची पेठ फाटयावरील फुटपाथ हीच निवार्याची हक्काची जागा. सोबत लहानसा दत्ता होताच. आईवडील दररोज मजुरी करून रात्री फुटपाथवर वास्तव्य करत. त्यांच्याच सोबत दत्ताचेही आयुष्य रस्त्यावरचे झाले.काही वर्षांनी हरी बोरसे यांना एका ठिकाणी बांधकाम चौकीदाराचे काम मिळाले. तर देउबाई धुणी-भांडी करून फाटक्या संसाराला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, दत्ताने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
दत्ताने धावण्याच्या स्पर्धा गाजवल्या. दत्ताला प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी हेरले. त्याच्यातील कौशल्य पाहून भोंसला मिलटरी स्कूलला प्रवेश देण्यात आला व तेथून दत्ताच्या आयुष्याची घोडदौड सुरू झाली. भोसला आणि नंतर केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत असताना दत्ताने राज्य व राष्ट्रीय पातळीवर 4 सुवर्ण सह 7 पदके प्राप्त केले.