लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महानगरातील विविध भागांतील दत्त मंदिरांमध्ये मंगळवारी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नाशिकच्या पुरातन एकमुखी दत्त मंदिरात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने मंदिर बंद ठेवून भाविकांना ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून पुरातन एकमुखी दत्त मंदिरात अगदी साध्या पद्धतीने व मोजक्या पुजारी वर्गाच्या उपस्थितीत सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने अन्य सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद ठेवण्यात येऊन भाविकांना ऑनलाइन, तसेच मंदिराबाहेर एलसीडी उभारून दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी रुद्राभिषेक त्यानंतर महावस्त्र समर्पण व मंदिराचे वंशपरंपरागत मुख्य पुजारी मयूर गुरुजी बर्वे यांच्या उपस्थितीत महापूजन केले जाणार आहे. सायंकाळी सव्वासहा वाजता दत्त जन्मोत्सव साजरा केला जाईल. दत्तजयंतीनिमित्त दरवर्षी भजन, कीर्तन, गुरुचरित्र पारायण, महाप्रसाद वाटप आदी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा देशात कोरोना संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्वच सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. ऑनलाइन, तसेच फेसबुक माध्यमातून भाविकांना दर्शनाची सोय करण्यात आल्याने भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन एकमुखी दत्त मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे. दत्त जयंती निमित्ताने मंदिराला रंगरंगोटी करण्यात येऊन मंदिर परिसरात पताका लावण्यात आलेल्या आहेत, तसेच मंदिरावर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आले आहे. त्याशिवाय शिंगाडा तलाव परिसरातील दत्त मंदिर, कालिका मंदिरानजीकचे दत्त मंदिर, तसेच शहरातील समर्थ सेवा केंद्रांमध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदिरानगर परिसरात सज्जता
इंदिरानगर आणि परिसरातील मंदिरांमध्ये सज्जता करण्यात आली आहे. त्यात जिल्हा परिषद काॅलनीतील श्री गुरुदेव दत्त मंदिर, परबनगरच्या दत्तकृपा सोसायटीतील दत्त मंदिरात, राजीव टाउनशीप येथील दत्तमंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक रोडलाही दत्तनामाचा जागर
नाशिक रोड, प्रतिनिधी
देवळालीगाव बाजार येथील श्री दत्त मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान असून, यंदा दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.२९) मूर्तीला महाअभिषेक करून गुरुचरित्राची सांगता होणार आहे. दुपारी व सायंकाळी महाआरती व पालखी प्रदक्षिणा होऊन दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
परिसरातील भाविकांनी १४ वर्षांपूर्वी मंदिराची उभारणी केली. त्यापूर्वी तेथे औदुंबराचे झाड व पिंड होती. अवधूत चिंतन समितीतर्फे मंदिराचे सर्व कामकाज बघितले जाते. गुरुपौर्णिमा व दत्तजयंती हे दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कोरोनामुळे यंदा कार्यक्रम भव्य स्वरूपात होणार नाही. छोट्या प्रमाणात दत्तजयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. वर्षभर मंदिरात सकाळ, सायंकाळ पूजा व दत्तजयंतीला अखंड हरिनाम सप्ताह होतो. सप्ताहामध्ये गुरुचरित्र व नवनाथ पारायण दररोज सायंकाळी होते, तसेच नाशिक रोडच्या दत्तमंदिर रोडवरील घैसास दत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, देवळाली गाव आठवडे बाजारातील श्री दत्त महाराज मंदिर, मुक्तिधाम, लक्ष्मीनारायण मंदिर, पोलीस ठाण्यातील श्री हनुमान दत्त महाराज मंदिर, बिटको कॉलेजमागील श्री एकमुखी दत्तमंदिर, शास्त्रीपथ श्री दत्तमंदिर, माडसांगवीतील श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर अशा सर्वच ठिकाणच्या दत्त मंदिरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात दत्त जयंतीनिमित्त भजन, कीर्तन, गुरुचरित्र पारायण, दत्तयाग, महाप्रसाद, भंडारा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.