नाशिक : आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध त्याच्या पोलीस पत्नीने छळ व फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात बुधवारी (दि. २९) सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने तडजोडीसाठी दिलेल्या वेळेत दत्तू व त्याची पत्नी आशा दोघांचे वकील यांच्यात समेट होऊन दत्तूने विवाह न्यायालयात मान्य केला.नाशिक ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या आशा दत्तू भोकनळ यांनी १६ तारखेला त्यांचे पती दत्तूविरुद्ध फसवणूक व छळ केल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात केली होती. आशा यांनी फिर्यादीत दत्तू यांच्यासोबत २२ डिसेंबर २०१७ साली खेड तालुक्यातील आळंदी येथे जय अंबे मंगल कार्यालयात हिंदू धर्म वैदिक पद्धतीने विवाह दोघांच्या सहमतीने केल्याचे म्हटले होते. ३ फेबु्रवारी २०१९ रोजी दत्तू यांनी आशा यांच्या आडगाव येथील घरी येऊन ९ फेब्रुवारी रोजी गावाकडे पुन्हा लग्न करायचे ठरविले व दोघांनी कुटुंबीयांना माहिती दिली. १० हजार रुपये आगाऊ देऊन चांदवडमधील एक लॉन्स आशा यांच्या कुटुंबीयांनी नोंदविले. मात्र ७ फेब्रुवारी रोजी दत्तू यांनी फोनवरून लग्न करणार नसल्याचे कळविल्याचे फिर्यादीत आशा यांनी म्हटले होते. १३ व १४ तारखेला दत्तू यांनी पुन्हा घरी येऊन वाद घालत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. पुन्हा २४ तारखेला संगमनेर येथे एका लॉन्समध्ये लग्न करण्याचे त्यांनी मान्य केले आणि आशा यांच्या वडिलांनी संगमनेर येथे जाऊन लॉन्स बुक केले व लग्नाची पुन्हा तयारी केली. पुन्हा दत्तू याने फोनवरून लग्नास येण्यास नकार दिला. त्यामुळे आशा भोकनळ यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून १६ मे रोजी दत्तूच्या विरोधात फिर्याद दिली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सुनावणी सुरू झाली. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अॅड. अर्चना शर्मा यांनी आपापसात तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तूने विवाह मान्य केला. न्यायालयाने अटी व शर्तीच्या अधीन राहून दत्तूला जामीन दिला.
दत्तू भोकनळला विवाह मान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:01 AM