चांदवड : आॅलिम्पिकमध्ये रोइंग क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावलेल्या दत्तू भोकनळ यांनी कुटूंबासमवेत सलग तीन दिवस मक्याची सोंगणी करून आजही आपले काळ्या मातीशी नाते घट्ट असल्याचे दर्शवून दिले आहे. दीड महिन्याची सुटी घेऊन भोकनळ हे रेडगावखुर्द या मूळ गावी आले आहेत. त्यांचे आई, वडील हयात नाहीत. दोन भाऊ, भावजयी, आजोबा यांच्या समवेत त्यांनी तळेगावरोही येथील वडिलोपार्जित दीड एकर मक्याच्या जिरायत शेतात काम करण्याचा आनंद लुटला. भोकनळ यांनी रोर्इंग या खेळात यशाचे शिखर गाठले, त्यानंतर ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून चांदवड व तळेगावरोही येथील सत्कारप्रसंगी आपल्या सरावाचा खर्च चाळीस हजार रुपये असल्याचे मान्यवरांसमोर सांगितले होते मात्र त्यांना लष्कराकडून यासाठी वेगळा निधी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आॅलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी केल्यानंतरही ते मातीला मात्र विसरले नाहीत. म्हणूनच ‘ज्या मातीत मी वाढलो, लहानसा मोठा झालो तिला मी कदापि विसरू शकणार नाही’ अशी भावना भोकनळ याने व्यक्त करतात.
दत्तू भोकनळचे आजही काळ्या मातीशी नाते घट्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:41 AM