चांदवड : इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपूत्र आणि भारतीय लष्करातील जवान रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी मेन्स क्वारडपल स्कलमध्ये उत्कृष्ठ कामगिरीचे प्रदर्शन करत सांघिक सुवर्णपदक पटकावले. यामुळे तळेगावरोही येथे ग्रामस्थांनी जल्लोष केला. चार वर्षांच्या नौकायन या क्रिडा प्रकारात भोकनळ यांनी नॅशनल अमेरिकन चँम्पियनशिप जिंकली. तर रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे स्थान १७ वरून १३ वर आणले. म्हणून महाराष्टÑ शासनाने त्यांना छत्रपती पुरस्कार देऊन गौरविले. आज झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरीचे प्रदर्शन करीत ७.४५ सेकंदात अव्वल क्रमांक मिळविला. २०१४ मध्ये नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, २०१५ मध्ये एशियन गेम्समध्ये पाचवा क्रमांक, २०१६ साठी आॅलिम्पिकसाठी निवड झाली होती. दत्तूच्या टिममध्ये भारतीय लष्करातील सर्वाण सिंग, ओम प्रकाश आणि सुखमित सिंग यांचा समावेश होता. पहिल्या फेरीत संघाने उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन घडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यात भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावले.
दत्तू भोकनळला सांघिक सुवर्णपदक, चांदवड तालुक्यात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:23 PM