पाथरे : पाथरे येथील मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.पाथरे येथील श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पहाटे काकड आरती परंपरा जोपासली जात आहे. कोरोना काळातही काकड आरती परंपरा जपली जात आहे.सॅनिटायझर, सामाजिक दुरी याचे यावेळी पालन केले जात आहे. दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास यामुळे हा कालावधी वाढला आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात पहाटे काकड आरती केली जाते. काकडा आरती म्हणजे एक महिन्या चालणारा हा उत्सव असतो. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार महत्व आहे. पहाटेच्या शांत वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती चा मधुर सूर निनादत आहे. काकड आरती मध्ये ज्येष्ठ, तरुण, महिला, बालके यांचा समावेश दिसतो आहे. यामुळे संस्कारक्षम पिढी घडते आहे. काकडा आरतीत भूपाळी, भजने, भक्ती गीते, अभंग, गवळण यांनी ग्रामस्थांच्या दिनक्रमास सुरुवात होत आहे. टाळ,मृदुंग, शंख, तानपुरा, घंटानाद आणि झांजेच्या मधूर स्वराने पाथरे करांची पहाट उल्हासित होत आहे. कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा काकडा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. या काळात पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरांमधून काकड आरती करण्याची पद्धत प्रचलित आहे. पहाटे काकडा पेटवून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. जय जय राम कृष्ण हरी, उठा उठा प्रभात झाली, उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा साधु संत साधा आपले हित, उठा सकळजन उठले नारायण, आम्ही गरीब गवळ्याच्या नारी, मुका झालो वाचा गेली, बहिरा झालो या जगी बहिरा झालो या सारखे अनेक भक्ती गीतांनी, भजनांनी पहाट साजरी होत आहे. सकाळी आरती व संध्याकाळी हरिपाठ, भजन, गवळण यामुळे तरुण, लहान बालके सुसंस्कारी होण्यास चालना मिळत आहे. काकड आरतीला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत निळोबा, संत मुक्ताई या संतांचे अभंग, भजनं म्हटले जातात. एका तालासुरात मंजुळ स्वरात आरती, पुष्पांजलि, प्रसाद गीत व इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर सर्वांना फराळ, चहा पाणी देऊन समारोप होत असतो. काकडा समाप्ती नंतर आळंदी येथे जाण्यासाठी पायी दिंडीचे सुद्धा आयोजन करण्यात येते परंतु याकोरोना काळात पायी दिंडी सोहळा होईल की नाही याची चिंता ग्रामस्थांच्या चेहर्यावर दिसत आहे. काकड आरती सोहळ्यात दत्त भजनी, मंडळ श्रीराम भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ, शनेश्वर भजनी मंडळ, गहिनीनाथ महिला भजनी मंडळ आदी मंडळांनी सहभाग घेत आहे.