नाशिक : डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि रोजीरोटीची भ्रांत. अशा अवस्थेत हक्कासाठी शेतकरी आदिवासी कष्टकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. बुधवारी नाशिकमध्ये दाखल शेतकºयांनी सोबत दोन दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून आणली असून, बुधवारची दिवस आणि रात्र यावरच काढल्यानंतर यातून उरलेल्या भाकर तुकड्याची गुरुवारी सकाळी न्याहारी करून मुंबईकडे आगेकूच केली. वृद्धांसह महिला व मुलांंनी रात्र नाशिक बसस्थानकात काढली.
लाल बावटा घेऊन हजारो कष्टकरी रणरणत्या उन्हात मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पोशिंदा मानला जाणारा शेतकरी, शेतमजूर, आदिवासी रस्त्यावर पायी चालत असून, सत्ताधारी सरकारच्या मनाला अद्याप पाझर फुटलेला नाही. सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाकडूनदेखील न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था शेतकºयांसाठी करण्यात आली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मोर्चेकरी दुपार आणि रात्रीचे भोजन आपापल्या शिदोरीवर भागवून निद्रिस्त झाले.‘शिदोरी’त नेमके होते तरी काय?हिरवी मिरची लसणाचा ठेचा अन् बाजरीची भाकर, गुळाचा खडा, मिठाची पुडी यापलीकडे बहुतांश शेतकºयांच्या शिदोरीमध्ये दुसºया प्रकारचा खाद्यपदार्थ आढळला नाही. थकलेल्या बळीराजाने महामार्ग बस्थानकावर शिदोरी उघडून दुपारची भूक भागविली. याच शिदोरीचा आधार रात्रीच्या जेवणासाठी घेतला.