शेखर देसाई
लासलगाव - टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत असून बुधवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोला २ ते ५ रुपये किलो असा बाजार भाव मिळाल्याने विक्रीसाठी आलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून दिले. शासनाने आम्हाला गांजाची शेती करायला परवानगी द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.
टोमॅटोच्या वीस किलोच्या कॅरेटला ५० ते १०० रुपये भाव मिळत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले मात्र मोठ्या प्रमाणात भावात घसरण होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने गांजाच्या शेतीची परवानगी देण्याची मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी करीत आहेत.