महेश पगारे नाशिकमकर संक्रांत सणाचे खास आकर्षण पतंग असून, त्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. बाजारपेठेत नायलॉन मांजाला बंदी असल्याने इतर मांजांची मोठ्या प्रमाणात आवक दाखल झाली आहे. कॉटन मांजामध्ये सुरती, बरेली, मैदानी, सुरती पांडा, बरेली पांडा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मांजा नऊ तार, बारा तार व सोळा तारमध्ये उपलब्ध आहे. मांजाची किंमत मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. १०० ते ४०० रुपयांपर्यंत मांजाची किंमत आहे. मांजाचे रीळ विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. मांजाची लांबी १००० मीटरपर्यंत उपलब्ध आहे. या रीळमध्ये बाजारपेठेत आसारी पहायला मिळत नाही. प्लास्टिक रीळ उपलब्ध आहे. बाजारात प्लास्टिकपासून तयार केलेल्या फॅन्सी पतंगाला मागणी आहे. पतंगाचे खास आकर्षण लहान मुलांना असल्याने कार्टून्समध्ये भीम, मोटू पतलू, टॉम अॅण्ड जेरीचे पतंग बाजारात जास्त प्रमाणात दिसत आहे. गरुड, कबुतर व घार यांच्या आकारातील पतंग लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहे. सिनेकलावंतांच्या प्रतिमांमध्येही पतंग उपलब्ध असल्याने आकर्षण ठरत आहे. यंदाचे खास आकर्षण मोदी पतंग आणि इको फ्रेंडली हॉट बलून ठरत आहे. मोदींच्या विविध प्रतिमांचे पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. पर्यावरणाला अनुसरून इको फ्रेंडली कंदिलाच्या आकारातील पतंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पतंगातून पर्यावरण रक्षणाचा संदेश जाईल, अशी अपेक्षा विक्रेते व्यक्त करत आहेत. याचबरोबर येवल्याचे प्रसिद्ध धोबी पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत. युवकांच्या मागणीनुसार विविध आकारांतील पतंग तयार करून दिले जातात. पतंगांची किंमत २ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत आहे. मकरसंक्रांत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने पतंग प्रेमींकडून मागणी वाढेल असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
रंगीबेरंगी पतंगांनी सजली बाजारपेठ
By admin | Published: January 02, 2016 11:54 PM