नाशिक जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि गुजरात राज्याच्या सीमेला लागून असलेला आहे. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण या तालुक्यांची सीमा गुजरातच्या सीमेपर्यंत आहे. नाशिक जिल्ह्यामार्गे अनेकदा अवैधरीत्या प्रतिबंधित मद्याची वाहतूक केली जात असल्याचे उत्पादन विभागाकडून होणाऱ्या कारवाईवरून दिसून येते. काही दिवसांपूर्वीच १ कोटी रुपयांचा मद्यसाठा भरारी पथकाने जप्त केला होता. दीव-दमण, सिल्वासा, दादरानगर हवेली यासारख्या केंद्रशासित प्रदेशांत निर्मित व त्याच भागात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची चोरटी वाहतूक नाशिकमार्गे वारंवार केली जाते. उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली जाते. मात्र, यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ असे चित्र पाहावयास मिळते.
लॉकडाऊन काळात मद्य विक्रीवर निर्बंध घातले गेले. यामुळे मद्यपींची पंचाईत जरी झाली असली तरी उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करीत बहुतांश भागांत विक्रेत्यांकडून देशी, विदेशी दारू, तसेच बीअरची विक्री चोरीछुप्या पद्धतीने केली गेली. शहरात कधी सायकलद्वारे, तर कधी रिक्षांमध्ये देशी-विदेशी दारू विक्रीचाही प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले.
---इन्फो--
बीअर विक्री घटली; विदेशीला मागणी वाढली
नाशिकमध्ये बीअर विक्रीचे प्रमाण मागील काही दिवसांपासून घटल्याचे विक्रेत्यांकडून बोलले जात आहे. मद्यपींकडून विदेशी मद्याला पसंती मिळू लागली आहे. बहुतांश परवानाधारक मद्यपींकडून घरपोच विदेशी मद्य मागविले जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. शक्यतो परवानाधारक मद्यपींकडून बीअरऐवजी विदेशी मद्यालाच प्राधान्य दिले जाते.
कोरोनामुळे निर्बंध कडक असल्याने सध्या आजूबाजूला भटकंती, पर्यटनही बंद असून, महाविद्यालयांचेही द्वार बंदच आहे. यामुळे तरुणाईकडून होणारी बीअरला मागणी कमालीची घटली आहे. एरवी तरुण वर्ग बीअर खरेदी करीत मद्य प्राशनाची हौस भागविताना दिसून येत होता. मात्र कोरोनाने यावर ‘ब्रेक’ लावला आहे.
--इन्फो--
पावणेतीन कोटींची दारू जप्त
नाशिक उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षभरात परराज्यात निर्मित झालेले सुमारे १० हजार ८४२ लिटर मद्य जप्त केले, तसेच २०१९ साली याचे प्रमाण ८ हजार लिटर इतके हाेते. गेल्या वर्षी १७ हजार ४१९ लिटर देशी दारू उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. हातभट्टीपासून निर्मित गावठी दारूही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यास पथकाला यश आले आहे. सुमारे ८ हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये सुमारे ७६० संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले, तर काहींचा थांगपत्ता अद्यापही लागलेला नाही.
--इन्फो--
महसूलला दारूचा आधार
शासनाच्या महसुलाला दारूचा मोठा आधार आहे. दारू विक्रीच्या माध्यमातून गोळा होणारा महसूल मोठा असतो. मागील वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे काही प्रमाणात दारूच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर परिणाम झाला असला तरी शासनाने मागील वर्षी लॉकडाऊन काळातसुद्धा दारू विक्रीच्या दुकानांना व्यवसायाची परवानगी दिलेली होती. यावरून दारू विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचे महत्त्व सहज अधोरेखित होते.
यावर्षी पाच महिन्यांत दारू विक्रीला फारसा वेग धरता आला नाही. फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट पसरली आणि मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांत कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडविला. राज्य शासनाला कडक निर्बंधांचा अवलंब करावा लागला आणि या निर्बंधांच्या कात्रीत मद्य विक्रीही सापडली.
---