नाशिक : आडगाव येथील एका द्राक्षबागेत सात वर्षे वयाचा प्रौढ नर बिबट्या मृतावस्थेत सोमवारी (दि.१४) आढळून आला. दरम्यान, बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तविला असला तरी ठोस कारणाच्या निदानाकरीता शवविच्छेदनानंतर 'व्हिसेरा' मेरीच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठविण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, आडगाव शिवारातील प्रभाकर माळोदे यांच्या गट क्रमांक ११९९ येथे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना द्राक्षबागेत एक मोठा बिबट्या मृतावस्थेत दिसून आल्याने शेतकरी घाबरले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी दाखल झाले. पथकाने तत्काळ मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह अशोकस्तंभावरील दवाखान्यात हलविला. पशुधनविकास अधिकारी डॉ.वैशाली थोरात यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले. यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे ठोस कारण अहवालात नमुद करण्याकरिता थोरात यांनी ह्यव्हिसेराह्ण राखून ठेवत प्रयोगशाळेकडे रवाना केला आहे. हा बिबट्या साधारणत: दोन दिवसांपुर्वी झाला असावा असा अंदाज असल्याचे थोरात यांनी सांगितले.दरम्यान, वन्यजीव संरक्षण अधिनियम अनुसुची-१मधील संरक्षित वन्यप्राणी असल्यामुळे बिबट्याच्या मृत्यूचे ठोस कारण नमुद करणे गरजेचे असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईल, प्रथमदर्शनी अंतर्गत रक्तस्त्राव, संसर्ग हे कारण नोंदविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.
संशयास्पद : आडगावला शेतात आढळला मृत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 3:51 PM
मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव, विषबाधा तसेच फफ्फुसाचा मोठा संसर्ग झाल्याचेही निष्पन्न झाले.
ठळक मुद्देठोस कारणाच्या निदानाकरिता 'व्हिसेरा' प्रयोगशाळेत