नाशिक : सुरगाण्यातील राहुडे येथील गावात अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. साथरोग पसरलेल्या या गावांमधील पाण्याचे सर्व स्रोत बंद करण्यात येऊन टॅँकरने शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने सुरगाणा तालुक्यातील राहुडे आणि कळवण तालुक्यातील वीरशेत येथे अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढतच असून, राहुडे येथील बशीराम पांडू लिलके (६५) आणि सीताराम जिवा पिठे (६५) या दोघांचा बुधवारी मृत्यू झाला तर दोन दिवसांपूर्वीच नामदेव गांगुर्डे या इसमाचा मृत्यू झाला आहे. कळवणमध्ये अतिसाराची लागण झालेल्यांची संख्या २४ वरून ३७ इतकी झाली आहे. यातील काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळवणमध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच तालुक्यांमधील पाणीस्रोतांची तपासणी करण्यात येऊन दूषित पाणीपुरवठा करणाºया ग्रामवसेवकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात आली होती. सुरगाणा आणि कळवण तालुक्यातदेखील पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. विशेष म्हणजे स्वच्छ पाणीपुरवठा करणारा तालुका म्हणून सुरगाण्याला जिल्हा परिषदेने ‘ग्रीनकार्ड’ देऊन गौरविले आहे. असे असतानाही पहिल्याच पावसात पाणीपुरवठा दूषित झाल्याने दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना अतिसाराची लागण झाली, तर तीन जणांना प्राण गमवावे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या दोन्ही गावात स्वतंत्र कक्ष सुरू केला असून, गावातील प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. राहुडेमध्ये १५ आरोग्य सेवक आणि चार डॉक्टरांचे पथक गावातील नागरिकांना पाणी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतानाच त्यांना पाण्याची स्वच्छता राखण्याबाबतचे मार्गदर्शन करीत आहेत. गावातील विंधन विहिरी तसेच विहीर बंद करण्यात आली असून, गावाला आरओयुक्त पाणी टॅँकरने पुरविले जात आहे.रुग्णांचा मृत्यू अतिसाराने नाहीराहुडे येथे मयत झालेल्या दोघा रुग्णांचा मृत्यू हा अतिसाराने नव्हे तर एकाचा मृत्यू हा फुफ्फुसाच्या आजाराने तर दुसºयाला पक्षघाताचा आजार असल्यामुळे त्याची प्रकृती अगोदरच नाजूक होती. त्यांना जुलाब, उलट्या झाल्याची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे अतिसाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हणता येणार नाही.- डॉ. विजय देकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारीहलगर्जीपणा करणाºयांवर कारवाईकळवण आणि सुरगाणा येथील गटविकास अधिकाºयांना गावात शुद्ध पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकांना सूचना देऊन गावातील साथरोगावर नियंत्रण मिळविण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास संंबंधित अधिकाºयांवर कारवाई नक्की केली जाईल. -अनिल लांडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदमाहिती दडविण्याचा प्रयत्नजिल्हा आरोग्य अधिकारी विजय देकाटे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले होते; मात्र दुसºयाच दिवशी दोन रुग्ण दगावल्याने यंत्रणेचा कारभार उघड झाला आहे. असे असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी देकाटे यांनी या तीनही मृत्यूंचा संबंध हा अतिसाराशी नसल्याचा दावा केला आहे. तर अतिसारामुळे अगोदरच आजारी रुग्ण गंभीर होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सुरगाण्यातील राहुडे गावात अतिसाराने दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:12 AM