नाशिक शहरातील सिडको भागातील एका कोरोनाबाधिताला महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन, न्यू बिटको तसेच मविप्र संस्थेच्या डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बेड मिळाला नाही. त्यामुळे रुग्णास थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावर दीपक डोके या कार्यकर्त्याने आणले हेाते. हा रुग्ण आपला नातेवाईक असून त्याला ऑक्सिजन बेड मिळत नाही म्हणून ही वेळ आल्याचे डोके यांनी सांगितले होते. याबरोबर आणखी एक कोरोनाबाधितदेखील महपाालिकेत याच ठिकाणी बेड मिळत नाही म्हणून आला होता. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवून देान्ही रुग्णांना नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील एक बाधित पळून गेला तर ऑक्सिजनची लेव्हल ३६ असल्याचे सांगितले गेलेल्या त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांची द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. सदरचा रुग्ण महापालिकेच्या कोणकोणत्या रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी गेला होता, त्याने कोणाशी संपर्क साधला, महापालिकेच्या संबंधित रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे का, महापालिकेच्या सेंट्रलाईज बेड सिस्टीम्ससाठी नियुक्त हेल्पलाइनवर त्यांनी संपर्क साधला होता काय या सर्व प्रकरणाची चाैकशी करून आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इन्फो...
या प्रकरणामागे नक्की कोण?
कोराेनाबाधित रुग्ण महापालिकेत आणून ऑक्सिजन बेड नाशिकमध्ये मिळत नाही, अशी बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याची शक्यता महापालिकेतील आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केली आहे. ही स्टंटबाजी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आयुक्तांनी केवळ या प्रकरणाची सखोल चौकशीच करण्याचे नव्हे तर या प्रकरणामागे नक्की कोण आहे त्याचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दीपक डोके याचा बोलवता धनी कोण आहे, याचाही शोध घेतला जाणार आहे.
इन्फेा...
दीपक डोकेच्या प्रकरण अंगलट, गुन्हा दाखल
सिडकोतील कोराेनाबाधिताला ऑक्सिजन सिलिंडरसहित महापालिकेत घेऊन येऊन त्याच्या जीविताला तसेच अन्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दीपक डोके याच्या विरोधात भादंवि कलम २६९, २७० व साध रोग प्रति अधिनियम कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.