येवला : तालुक्यातील विखरणी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या हरिणाला तरुणांनी जीवदान दिले आहे.पाटोदा, विखरणी व कानडी परिसरात हरिणांचे कळप आहेत. विखरणी - कानडी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याच्या शोधात निघालेल्या हरिणांच्या कळपामागे भटके कुत्रे लागले. कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी धावताना या कळपातील एक हरीण विहिरीत पडले. कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी सदर घटना पाहिली.योगेश उशीर या तरुणाने तात्काळ सत्तर फूट खोल असणाºया विहिरीत उतरून हरिणाला दोराच्या साहाय्याने बांधून गोरख शेलार, सोमनाथ उशीर, ज्ञानेश्वर काळे, गोरख आहेर, भागवत जिरे, दिनकर काळे, रवि उशीर, दादा शेलार या सहकाऱ्यांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले. अकस्मात विहिरीत पडल्याने सदर हरीण जखमी झाले होते. सदर घटनेची माहिती वनविभागाला देऊन हरिणाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
विहिरीत पडलेल्या हरिणाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:22 PM