इंदिरानगर : कलानगर ते श्रद्धाविहार कॉलनीदरम्यान सुरू असलेल्या दुभाजकावर आठ दिवसांपूर्वी अपघात होऊन जखमी झालेले जयेश शंकर बडवे (५०, रा़सप्तशृंग रो - हाऊस वडाळा पाथर्डी रस्त्यालगत) यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ रस्ता दुभाजकाचे काम करताना ठेकेदाराने नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना वा वाहनधारकांसाठी रेडियम न लावल्यानेच हे अपघात होत असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे़ सहा वर्षांपूर्वी वडाळा नाका ते राजसारथी सोसायटीपर्यंत वडाळा-पाथर्डी रस्त्याचे लाखो रुपये खर्च करून रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले़ यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली असली तरी कलानगर ते पाथर्डी गावापर्यंत रस्त्याचे काम झालेले नाही़ त्यामुळे वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय होत असून, गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे़ यामुळे सार्थकनगर, जनार्दनस्वामी नगर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करणाऱ्यांची सोय झाली आहे़ठेकेदाराने या रस्त्यावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुभाजक टाकण्याचे काम सुरू केले; मात्र कलानगर ते श्रद्धाविहार कॉलनीदरम्यान चुकीच्या ठिकाणी पंक्चर टाकत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी काम बंद पाडले़ दुचाकीधारकांना काम चालू आहे हे समजेल अशा प्रकारची कोणतीही खबरदारी संबंधित ठेकेदाराने घेतलेली नसल्याने शुक्रवारी (दि़ २८ नोव्हेंबर)ला जयेश बडवे यांचा (एम.एच. १५ ईके ४५९६) अपघात झाला़ डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचे निधन झाले़दरम्यान, या अर्धवट कामामुळे दिवसागणिक अपघातांची संख्या वाढत चालली असून, चुकीच्या ठिकाणचे पंक्चर काढावे, तसेच हे काम सुरू असेपर्यंत नागरिकांना ते समजेल अशा प्रकारच्या सूचना लावण्यात याव्यात़ तसेच या अपघातास ठेकेदार जबाबदार धरून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़ (वार्ताहर)
उपचारादरम्यान मृत्यू
By admin | Published: December 07, 2014 2:00 AM