पंचवटी : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी-म्हशीच्या गोठ्यावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या वीजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक लॉन्सशेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ या गोठ्यावरून विद्युत वितरण कंपनीची वायर गेल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादरोडवरील सिद्धिविनायक लॉन्सशेजारी पवन लोहट यांच्या मालकीचा गुरांचा गोठा (पवन डेअरी) आहे़ लोहट यांच्या डेअरी उत्पादनासाठी या गोठ्यामध्ये शंभर म्हशी आहेत़ विद्युत वितरण कंपनीने काही दिवसांपूर्वीच या गोठ्याच्या वरून विद्युतवाहिनी टाकली होती. रविवारी हवा सुटल्याने पोलवरील वीजवाहिनी हलून विजेच्या तारांचा गोठ्यावरील लोखंडी पत्र्यांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट झाले़ यामुळे विद्युतप्रवाह गोठ्यात उतरून एका रांगेत बांधलेल्या आठ म्हशींना विद्युतप्रवाहाचा झटका बसल्याने त्या जागीच ठार झाल्या.आडगाव पोलीस व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी केली तर पोलिसांनी पंचनामा केला़ रविवारी सकाळी या गोठ्यात विद्युतप्रवाह उतरून म्हशी दगावल्या त्यावेळी काही कामगारही गोठ्यात काम करीत होते़ सुदैवाने वीजप्रवाह उतरल्याचे लक्षात आल्याने कामगारांनी गोठ्याबाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले़वीज वितरणच्या चुकीमुळे घटनाऔरंगाबादरोड वरील पवन डेअरीजवळ वीज वितरण कंपनीने वीजवाहिनी टाकली होती. या वीजवाहिनीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना विरोधही केला होता, मात्र तरीही वीज वितरण कंपनीने ही वीजवाहिनी टाकली़ रविवारी सकाळी शॉर्टसर्किट होऊन वीजप्रवाह उतरल्याने गोठ्यातील आठ म्हशी दगावल्या़ यामुळे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.- पवन लोहट, डेअरीचालक