नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सारसाळे (करंजखेड) येथे भरविण्यात आलेल्या तांगा शर्यतीत घोड्याने तोंडावर लाथ मारल्याने देवपूर (देवठाण) येथील शेतकरी सुरेश महादू दुशिंग (४८) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.३) दुपारी घडली. तांगा शर्यत एका शेतकºयाच्या जिवावर बेतल्याने पोलिसांनी तांगा शर्यत आयोजन करणाºयांची चौकशी सुरू केल्याचे समजते. या शर्यतीत एका ४८ वर्षीय शेतकºयाला जीव गमवावा लागल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात तांगा शर्यतींवर बंदी असतानाही शर्यत सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सारसाळे येथे रविवारी परिसरातील काही लोकांनी तांगा शर्यतीचे आयोजन केले होते. देवपूर (देवठाण) येथील शेतकरी सुरेश दुशिंग हे स्वत: तांगा शर्यतीसाठी गेले होते. दुपारी तांगा शर्यतीसाठी घोडा आणि बैल जुंपलेला होता. शर्यत सुरू असताना तांग्याला जुपलेल्या घोड्याने दुशिंग यांच्या तोंडावर जोरात लाथ मारल्याने दुशिंग हे बैल जुंपण्याच्या जूवर आदळल्याने डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत दुशिंग यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. सोमवारी दुशिंग यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तांगा शर्यतीवर बंदी असताना तांगा शर्यतीचे आयोजन कोणी केले याची चौकशी पोलिसांनी सुरू केल्याचे समजते.
दिंडोरी तालुक्यात घोड्याच्या लाथेने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:39 AM