मुरमी येथील ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोग व मनरेगाअंतर्गत शिवार रस्ते, शौचालय, वृक्ष लागवड, स्मशानभूमी दुरु स्ती, जलसंधारण योजनेतून गाळ काढणे, ३८ गाव पाणी पुरवठा पाईप लाईन या कामात वापरल्या गेलेल्या निधीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच रोजगार हमी योजनेत काम करणारे मजूर म्हणून सरपंच व उपसरपंच व रोजगार सेवक यांनी स्वत:च्या घरातील सदस्यांसह गावातील गोरगरीब लोकांच्या नावे बँकेत बनावट खाते उघडून त्यांची नावे एटीएम प्राप्त करून त्याद्वारे निधी काढला आहे. याबाबत खातेधारकाला कुठलीही कल्पना नसून त्यांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. या कामात सुमारे ५० लाखांचा बेकायदेशीर व्यवहार झाला असून या कामाच्या चौकशीसाठी अनेकदा निवेदन तसेच तक्र ार देखील केली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. भ्रष्टाचारातील अधिकारी, कर्मचारी यासह सहभागी व्यक्तींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत गटविकास अधिकारी शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर आनंदा पानसरे, छबू गोसावी, निवृत्ती शिंदे, राजाराम पानसरे, नवनाथ शिंदे, बाळकृष्ण बगाटे, ज्ञानेश्वर पानसरे, बबन शेळके, राजाराम गोसावी, रावसाहेब शिंदे, गोविंद पानसरे, विश्राम उठाळ, अनिल गावंडे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुरमीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 6:53 PM