लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : गेल्या आठवड्यातील सततच्या कडक उन्हाचा त्रास माणसांना जसा होत आहे तसा तो पक्ष्यांनाही होत आहे. शहरातील बौद्धविहारमधील पाण्याच्या कुंडीवर उडत येणारे कावळे पाण्याशेजारी मरून पडल्याचे करुण दृश्य एका पक्षीप्रेमीने टिपले. तहानलेले पक्षी कित्येक मैलांचे उड्डाण करून पाण्याच्या शोधात फिरत असतात. अचानक पाणी समोर दिसले की पिण्याचा आवेग त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होतो. काही वर्षांपूर्वी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे हिसवळ या गावाजवळ अनेक मोरांचा मृत्यू झाला होता. तेव्हा शवविच्छेदन अहवालात वॉटर इन्टॉक्सिकेशन या कारणामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तहान लागल्यावर कमी वेळात खूप भरभर व अधिक पाणी पिण्यात आले तर शरीरातील सोडियम, पोटेशियम यांचे इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडून त्याचा परिणाम मेंदूच्या क्रियांवर होतो आणि त्या सजीवाचा मृत्यू होतो.या स्थितीला वैद्यकीय शास्त्रात हायपोनेत्रिमिया असे म्हणतात. सध्या दुपारी विविध पक्षी घरटे किंवा घरे, इमारती, विहीर, बारव आदी ठिकाणी सावलीला व गारव्याला राहून पाण्याच्या शोधात दिसतात. तप्त उन्हात पक्षी पाण्यासाठी व सावलीचा शोध घेतात. त्यांच्या अन्न-पाण्याची नागरिकांनी आपापल्या परीने सोय करावी. घराच्या गच्चीवर सावलीला पाण्याची सोय करावी, असे आवाहन पक्षिप्रेमींनी केले आहे
नांदगावी तृषार्त कावळ्यांचा मृत्यू
By admin | Published: May 22, 2017 1:17 AM