नाशिक - कोरोना बाधित गंभीर रुग्णांना शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे. मात्र, सिडकोतील अशाच एका रुग्णाला ऑक्सिजन कमी होऊनही वेळ मिळत नसल्याने त्याला थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारावरच आणण्यात आले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली अखेरीस महापालिकेने रुग्णवाहिका पाठवून त्यास नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आंदोलनाचा लढा यशस्वी करणाऱ्या रुग्णांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.
सिडकोतील या रुग्णाचा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वी आला होता. मात्र, प्रकृती गंभीर असूनही खासगी रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यातच त्याची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्याकडे हा प्रकार कथन केल्यानंतर त्यांनीही विविध रुग्णालयांमध्ये संपर्क साधला. मात्र, ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने त्यांनी अखेरीस या रुग्णाला घेऊन थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवनाची प्रवेशद्वार गाठलं.
शहरातील कोरोना बधितांचा आकडा वाढत असताना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत महापालिकेच्यावतीने खासगी आणि शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार यावेळी त्यांनी केली. शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्यास दुजोरा दिला. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने मनपाची रुग्णवाहिका पाठवली आणि त्यानंतर या रुग्णास नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला.
आंदोलनासाठी महापालिकेत आणणारांवर गुन्हाकोरोनाबाधित रुग्णाला आंदोलन करण्यासाठी महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर पालिकेकडून कारवाई होणार आहे. बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.