चांदवड : तालुक्यातील कळमदरे येथे मोराचा मृत्यू झाला आहे. वनविभागाने याबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. कळमदरे परिसरात ५०० ते ५५० हेक्टर जंगलाचा परिसर असून, यात वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, रानडुकरे, मोर असे प्राणी आढळून येतात. येथे बुधवारी एका मोराचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत त्वरित वनविभागाने राष्ट्रीय पक्ष्याचे संरक्षण करावे, अशी मागणी उपसरपंच राजेश गांगुर्डे यांनी केली आहे. हा मोर तडफडत असताना उपसरपंच राजेश गांगुर्डे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रथमोपचार करून त्यास पाणी पाजले. परंतु तो जगू शकला नाही, तर दुगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जोंधळे यांनी शवविच्छेदन केले. उपसरपंच गांगुर्डे व ग्रामस्थांनी अंत्ययात्रा काढून या मोराचा दफनविधी केला . कळमदरे परिसरात करोडो रुपयांची सागवान लाकडे असून, त्याची सर्रास तस्करी होत असल्याचे बोलले जाते. (वार्ताहर)याबाबत वेळोवेळी वनविभागाला व संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीने निवेदन दिले आहे. परंतु वनविभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. या प्रकाराकडे संबंधित डोळेझाक करतात ग्रामपंचायतीला मिळणारा निधी वनविभाग हडप केल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप गांगुर्डे यांनी केला आहे. जंगली जनावरे रात्रीच्या वेळी शेतात येऊन शेतीचे नुकसान करतात, तर शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी जीव मुठीत धरुन काम करतात. याकडे वनविभागाने लक्ष द्यावे व राष्ट्रीय पक्षी मोरांचे सरंक्षण करावे, अशी मागणी होत आहे. ( वार्ताहर )
कळमदरे येथे मोराचा मृत्यू
By admin | Published: August 14, 2014 11:24 PM