कामगार युनियनचा विरोध : ठोस हमी नाही; कारवाईवर प्रशासन ठामनाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्यावर सुमारे ८५ कोटींच्या थकबाकीमुळे जिल्हा बॅँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येणार असून, त्यादृष्टीने आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया प्रशासकीय मंडळाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. नासाकाच्या कामगार युनियनने मात्र जप्तीची कारवाई करण्याऐवजी कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने मदत करावी, अशी मागणी केली असून, जप्तीची कारवाई झाल्यास कामगार मुलाबाळांसह आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निफाड साखर कारखाना व नाशिक साखर कारखान्याकडे एकूण २२५ कोटींची थकबाकी असून, या दोन्ही कारखान्यांच्या ताब्यातील गुदामांमध्ये सुमारे १०५ कोटींची साखर असून, ही साखर विकून त्यातून वसुली करण्यासाठी जिल्हा बॅँकेने सवार्ेच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर असलेली स्थगिती मागील आठवड्यात न्यायालयाने उठविल्याने जिल्हा बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाकडून या दोन्ही साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच नासाकाच्या कार्यक्षेत्रावर संचालक मंडळ व कामगार युनियनची मीटिंग होऊन या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्याचा निर्णय झाला, तसेच जिल्हा बॅँकेला थकबाकीपोटी काही रक्कम देण्याचेही निश्चित झाले. दुसरीकडे, थकीत रक्कम भरण्याविषयी नासाकाच्या संचालक मंडळाने काही ठोस हमी दिल्याशिवाय जप्तीची कारवाई मागे घेता येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे, कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यास २१ मेपासून मुलाबाळांसह उपोषण करण्याचा इशारा युनियनचे विष्णुपंत गायखे, शिवाजी गाडे, शिवराम गायधनी, बबनराव कांगणे, खंडेराव पाटील, मोतीराम तिदमे आदिंनी जिल्हा बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाला निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)
नाशिक साखर कारखान्यावर जप्तीची टांगती तलवार
By admin | Published: May 19, 2014 11:51 PM