सातपूरच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीची फाशीची शिक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:43 AM2019-05-01T00:43:38+5:302019-05-01T00:44:25+5:30
सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे.
नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर कार्बननाका येथे राहणाऱ्या पल्लवी संसारे (३४) व मुलगा विशाल (७) या दोघांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले रामदास शिंदे याची मुंबई उच्च न्यायालयाने खटल्यातून निर्दाेष मुक्तता केली आहे. ज्या परिस्थितीजन्य पुराव्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते, पुराव्यांनाच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यात न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला.
१८ एप्रिल २०१६ मध्ये ही घटना घडली होती. संशयित रामदास शिंदे याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या पल्लवी संसारे व मुलगा विशाल यांचा हत्याकांड करण्यात आले होते. त्यानंतर पल्लवीेचे पती कचरू संसारे यांनी फिर्याद दिली होती. घरमालक रामदास शिंदे हा फरार असल्याने त्याच्यावर संशय बळावला होता व नंतर त्याला अटक करून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने गेल्या वर्षी २६ एप्रिल २०१८ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी रामदास शिंदे यास फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध शिंदे याच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात अपील केले, त्याची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे श्ािंदे याच्याविरुद्ध सादर करण्यात आलेले पुराव्यांवरच अॅड. निकम यांनी संशय व्यक्तकरून आरोपीला फाशी ठोठावण्या इतपत कोणताच पुरावा न्यायालय पुढे नाही, तसेच खटल्यात कोणताच प्रथमदर्शनी साक्षीदार नसून संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि परिस्थितीजन्य पुराव्याची सबळ साखळी सरकारी वकिलांनी कोर्टात मांडली नाही आणि अशा परिस्थितीत रामदास शिंदे यास फाशीची शिक्षा देणे चुकीचे असून, त्यांची निर्दोेष मुक्तता करण्यात यावी, असा युक्तिवाद केला व त्याच्या पुराव्यादाखल काही निवाडेही सादर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, प्रकाश नाईक यांनी शिंदे याची दुहेरी हत्याकांडातून निर्दोष मुक्तता केली.
खटल्यात स्पेक्ट्रोग्रापीची टेस्ट
या खटल्यात पहिल्यांदाच आरोपीच्या आवाजाची स्पेक्ट्रोग्रापी टेस्ट घेण्यात आली होती. त्याचे पुरावे जिल्हा न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. परंतु ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी अन्य नागरिकांना कोणताही आवाज आला नसल्याची बाब न्यायालयापुढे मांडण्यात आली. मयत दोन्ही मायलेकावर एकूण ५४ घाव करण्यात आले, त्यावेळी आरडाओरड झाली असती. असा प्रश्न अनुत्तरित असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले.