कळवण : तालुक्यातील सुळे येथील आदिवासी आश्रमशाळेतील नववीच्या विद्यार्थिनीला चक्कर येऊन उलटी झाल्याने तिला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. आश्रमशाळेतील शिपायाला सोबत पाठवून मुख्याध्यापकासह अधीक्षकाने घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता टाळाटाळ केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. सुळे येथे अनुदानित माध्यमिक पहिली ते दहावीपर्यंतची मुला-मुलींची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत दुपारी जेवण झाल्यानंतर नववीतील भारती बाळासाहेब पवार (१५) हिला उलट्या होऊ लागल्याने जयदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणण्यात आले; मात्र जास्त त्रास होत असल्याने कळवण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणत असताना रस्त्यातच भारतीचा मृत्यू झाला. भारती हिचा असा अचानक उलट्या होऊन मृत्यू झाल्याने तिच्या मृत्यूबद्दल पालकांनी साशंकता व्यक्त केली आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयात भारती हिच्या पालक व नातेवाइकांनी जोपर्यंत मुख्याध्यापक येत नाही तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन न करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा हे सांगण्यास असमर्थता दर्शवली. (वार्ताहर)
सुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू
By admin | Published: February 18, 2016 10:30 PM