गेल्या वर्षी पेक्षा यंदा कोराेनाची लाट मोठी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, नाशिकमध्ये संसर्ग वेगाने पसरतोच आहे, परंतु त्याचबरोबर मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एप्रिल महिन्यात तर एका दिवसात तीसपेक्षा कमी मृत्यू झाल्याची अपवादानेच नोंद आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.२०) एकाच दिवसात ५७ बळींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे बाधितांची संख्या शहरात जास्त असली तरी ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. नाशिक शहरात नऊ, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात तीन रुग्ण दगावले, तर उर्वरित ग्रामीण भागात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा बाह्य दोन जणांचादेखील मृत्यू झाला आहे. मृत्यूची वाढलेली आकडेवारी नाशिककरांच्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे. गेल्या वर्षीपासून आत्तापर्यंत कोरोनाबळींची संख्या ३ हजार ३२ झाली आहे.
दरम्यान, दिवसभरात ५ हजार ५ इतके नवे रुग्ण आढळले असून, यात नाशिक शहरातील २ हजार ७७७, तर ग्रामीण भागातील २ हजार १६७ बाधितांचा समावेश आहे. मालेगाव येथील २१ आणि जिल्हाबाह्य ४० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३ हजार १६८ रुग्ण बरे झाल्याचीही नोंद झाली आहे.