मंगळवारी पाच बाधितांचा मृत्यू झाला असून, तालुक्यात आजपर्यंत १०१ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. गेल्या महिन्यात कोरोनाने ११ बळी गेले होते, तर चालू महिन्यात आत्तापर्यंत ३५ बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची वाढती संख्या हा प्रशासनासह तालुकावासीयांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना संशयित रुग्ण लक्षणे दिसून येताच उपचार घेत नाहीत वा तपासणीही करून घेत नाही. परिणामी जादा त्रास जाणवू लागल्यानंतर दवाखान्यात येतात. यावेळी उशीर झालेला असतो त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत असल्याचे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे यांनी सांगितले.
सर्दी, ताप-अंगदुखी, घसा दुखणे, तोंडाला चव नसणे, वास न येणे, अशक्तपणा आदींपैकी कोणतीही लक्षणे दिसून येताच तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. कातकडे यांनी केले असून औषधोपचाराने कोरोना बरा होतो असे स्पष्ट केले आहे.
इन्फो
बेडस् झाले फुल्ल
तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २७१९ झाली असून, यापैकी २१८५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्य:स्थितीत अॅक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या ४३३ इतकी झाली आहे. कोविड सेंटर असणार्या येवला उपजिल्हा रुग्णालयातील ६८ व नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयातील ३० बेड्स सद्य:स्थितीत फुल्ल झालेले आहेत. तर बाभूळगाव येथील विलगीकरण कक्षात २०० बेड्सची व्यवस्था असून, या ठिकाणी १०२ बाधित दाखल आहेत.