चांदोरी : येथील गोदावरी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा नदीपात्रातील हेमाडपंती मंदिर परिसरातील गाळात अडकून मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चंद्रकांत गणपत भवर (३२) व रवींद्र राजेंद्र डगळे (१९) हे दोघे तरुण आपल्या मित्रांसमवेत नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी उतरले होते. हेमाडपंती मंदिरातील मासे पकडण्यासाठी त्यांनी मंदिरात प्रवेश केला, परंतु ते गाळात अडकले. त्यानंतर रवींद्र व चंद्रकांत नजरेस न पडल्याने त्यांच्या समवेत असलेले नवनाथ डगळे यांनी त्यांचा शोध सुरू केला; परंतु ते सापडत नसल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. सायखेडा पोलीस ठाणे व चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीस त्यांनी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन व पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी मदतकार्य सुरू केले. प्रथम आपत्ती व्यवस्थापन समितीचे कर्मचारी मंदिरावर दाखल झाले. पाण्याच्या पातळीपासून मंदिराचा दरवाजा १ फूट खाली असल्याने मंदिरात अपुरा सूर्यप्रकाश असल्याने शोध घेणे कठीण होते. यावेळी पोलीसपाटील अनिल गडाख व चांदोरी आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख, फकिरा धुळे, बाळू आंबेकर, विलास सूर्यवंशी, राजेंद्र टर्ले, नवनाथ डगळे, शरद वायकंडे यांनी मृतदेह बाहेर काढण्यास मदतकार्य केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. मृत चंद्रकांत भवर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे, तर रवींद्रच्या पश्चात आई-वडील,भाऊ, बहीण असा परिवार आहे.
गोदावरी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 1:44 AM