पिंपळगाव बसवंत : येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करून याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाइकांसह परिसरातील महिलांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे. पिंपळगाव येथील अंबिकानगर, महादेववाडी येथील रहिवासी छाया विलास भवर यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांना कावीळ झाली असून, काविळीचे निदान आम्ही करत नाही. रुग्ण महिलेला नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवा असा सल्ला या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. संबंधित महिलेला वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आतच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित महिलेला कावीळ झालीच नसल्याचे नातेवाइकांना कळले. त्यामुळे नातेवाइकांना शंका आली, असे निवेदनात म्हटले आहे. पिंपळगावचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी सदर निवेदन स्वीकारले. निवेदनावर सुमन शेवरे, राजूबाई शेवरे, शांताबाई धुळे, योगीता धुळे, सुमन बागुल, सीताबाई धुळे, गीता पिठे, बेबीताई आंबेकर, सोन्याबाई बेजेकर, गंगूबाई शेवरे, प्रभा जाधव, सुमन गायकवाड, चांदनी कदम, रंजना गायकवाड, माधुरी पवार आदींसह परिसरातील बहुसंख्य महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.शस्त्रक्रिया करतानाच डॉक्टरांकडून काहीतरी चूक झाल्यामुळे छायाचा जीव गेला असल्याची तक्रार नातेवाइकांनी निवेदनात केली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच छायाला जीव गमवावा लागला, असा आरोप करीत संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:58 AM