पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरूडगाव येथील सागर संजय भगरे (२१) हा गुरुवारी (दि.१३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसोबत गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सागर बुडाला. या घटनेची खबर ताबडतोब निफाड पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस हवालदार बबन लहरे, पोलीस हवालदार निकम, पोलीस नाईक निकम आदी घटनास्थळी पोहोचले. बुडालेल्या सागरचा शोध घेण्यासाठी चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाचे सागर गडाख, फकिरा धुळे, शरद वायकांडे, वैभव जमधडे, सुभाष फुलारे, सोमनाथ कोटमे, विलास गडाख, केशव झुर्डे आदींनी गुरुवारी रात्री ११ वाजता गोदावरी पात्रात बोटीच्या साहाय्याने सागरचा शोध घेण्यास प्रारंभ केला. पूर्ण रात्रभर गोदावरी पात्रात हे पथक शोध घेत होते. शुक्रवारीही दिवसभर या पथकाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सागर भगरेच्या मृतदेहाचा शोध घेण्यात यश आले. मयत सागरच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन लहरे करीत आहेत.
कुरूडगाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:14 AM