पंचवटी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ ६) पहाटेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगरमध्ये घडली़ या घटनेत नऊ महिन्यांची चिमुरडी सिद्धी रामेश्वर शेंडगे (नात) हिचा मृत्यू झाला असून, प्रेयसी व तिची मुलगी या ८० टक्के भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दरम्यान, संशयित प्रियकर जलालुद्दीन खान हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर येथे राहणाऱ्या ४०वर्षीय महिलेचे परिसरातील जलालुद्दीन खान (५०, मूळ रा़ मथुरा, उत्तरप्रदेश) सोबत वर्षभरापासून अनैतिक संबंध होते़ हे दोघेही काही महिन्यांपासून एकत्र राहत होते, तर गत आठवड्यातच या महिलेने फुलेनगर येथील खोली सोडून मायको दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या कालिकानगरला भाडेतत्त्वावर खोली घेतली होती़ तीच्याकडे चार-पाच दिवसांपासून तिची कोणार्कनगरला राहणारी विवाहित मुलगी व नात सिद्धी रामेश्वर शेंडगे (९ महिने) या दोघी आल्या होत्या़ तर रविवारी जलालुद्दीन खान व महिला यांच्यामध्ये अनैतिक संबंधावरून वाद झाला होता़ रविवारी रात्रीच्या सुमारास संशयित जलालुद्दीन हा महिलेच्या घरी आला असता तिने ‘तू तुझे कुटुंब व मूलबाळ सांभाळ, आत तुझ्या घरी जा’ असे वारंवार सांगितले; मात्र त्याने ऐकले नाही. यानंतर सोमवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असलेली प्रेयसी, तीची मुलगी व नात सिद्धी शेंडगे यांच्या अंगावर रॉकेल ओतून खान याने पेटवून दिले़ यामध्ये सिद्धी शेंडगे या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला तर प्रेयसी व तीची मुलगी गंभीर जखमी झाल्या़ या दोघींनी आरडाओरड केल्याने शेजारील नागरिकांनी धाव घेतली असता या दोघीही जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या़या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या मायलेकींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या दोघीही ७० ते ८० टक्के भाजल्या असून मृत्यूची झुंज देत आहेत़ दरम्यान, सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकाºयांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली, तसेच परिमंडळ एकचे प्रभारी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची पाहणी केली़ या घटनेतील संशयित जलालुद्दीन खान पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पंचवटी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे़खानविरोधात गुन्हा दाखलया घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित खानविरोधात खुनाचा तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंभीररीत्या भाजलेल्या दोघींचेही जबाब पोलिसांनी व दंडाधिकाºयांनी नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे़
अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रेयसीसह तिघींना पेटविले; चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:45 AM