शिंदे टोलनाक्यावर सोमवारी मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी केल्यानंतर बहुतेक वाहनांना फास्टॅग स्टिकर लावले नसल्यामुळे टोलनाक्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. फास्टॅग नसलेली वाहने फास्टॅग लेनमधूून गेल्यावर त्या वाहनधारकांकडून दंडात्मक दुप्पट टोल आकारणी करण्यात आली. यामुळे वाहनधारक व टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात तू तू-मै मै होऊन वादविवाद होत असल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या रांगा लागण्यात व वाहतुकीची कोंडी होण्यात होत होता.
फास्टॅगबाबत वाहन मालक-चालक यांना योग्य ती माहिती देण्यात येत नसल्यामुळे तसेच टोलनाक्यावरदेखील फास्टॅगबाबत मार्गदर्शन करणारा माहिती फलक नसल्याने वाहन चालक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत होता. वाहनाच्या पुढील काचेला आतमधून लावलेले फास्टॅग स्टिकर ओल्या कपड्याने पुसू नये, उन्हामध्ये जास्त वेळ गाडी उभी केल्यास फास्टॅग चीप खराब होते, फास्टॅग व्हायलेटमध्ये पैसे असले तरी फास्टॅग स्टिकर चीप खराब झाल्यामुळे स्कॅन न झाल्यास वाहनधारकाला फास्टॅग लेनमध्ये असल्यास दंडात्मक दुप्पट टोल भरावा लागत आहे.
चौकट====
दोन हजार वाहनांना दंड आकारणी
शिंदे टोलनाक्यावर सोमवारपासून फास्टॅग टोल आकारणी सुरू केल्यानंतर २४ तासात सुमारे १८०० ते २००० हजार वाहनांना फास्टॅग लेनमध्ये गेल्यामुळे, फास्टॅग चीप खराब झाल्यामुळे वफास्टॅग व्हायलेटमध्ये पैसे नसल्यामुळे दंडात्मक दुप्पट टोल दंड भरावा लागल्याची माहिती टोल व्यवस्थापनाने दिली.
दरम्यान, शिंदे टोलनाक्यावर फास्टॅग टोल आकारणीमुळे वाहनधारकांचा झालेला गोंधळ, वाहनांच्या लांबलचक लागलेल्याा रांगा वाहतुकीची झालेली कोंडी यामुळे पुणे बाजूकडून नाशिकच्या दिशेने येणारे काही वाहनधारक टोलनाका चुकविण्यासाठी शिंदेगाव शिवाजीनगर येथून देवी मंदिर रस्त्याने टोलनाक्याच्या पुढील बाजूस निघून मार्गस्थ होत होते.
प्रतिक्रिया===
फास्टॅगबाबतची माहिती नसल्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. शासनाकडून याबाबत सविस्तर माहिती देणे गरजेचे असून, केंद्र शासनाच्या नियमाची अंमलबजावणी टोलनाका कंपनी व कर्मचारी करत आहे; मात्र वाहनधारकांच्या रोषाला नाहक बळी पडावे लागत आहे.
-नानक लुल्ला, व्यवस्थापक, शिंदे टोलनाका
-----
वाहनांवरील चालक, बदली चालक व ग्रामीण भागातील वाहनधारकांचा विचार न करता केंद्र शासन दंडात्मक कारवाई करून आर्थिक पिळवणूक करीत आहे. फास्टॅगबाबत केंद्र शासन व टोल वसूल करणाऱ्या कंपनीने टोलनाक्यावर सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सविस्तर माहिती लिहिणे गरजेचे आहे.
-राजेंद्र शेलार, वाहनचालक
(फोटो १६ टोल)