नाशिक : वैयक्तिक कर्जपुरवठा करणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत त्या कंपनीचा स्वत:ला अधिकारी भासवून कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवत तोतया अधिकाऱ्याने एका युवकाला सुमारे अडीच लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून कर्जप्रकरणांच्या मंजुरीचे आमिष दाखवून चोरट्यांकडून अनेकांना गंडा घातला जात आहे. हे भामटे कर्जपुरवठा करणाऱ्या बजाज फायनान्ससारख्या कंपनीच्या नावाचा वापर करत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले. काही दिवसांपूर्वीच आर्टीलरी सेंटरमधील एका जवानाला अशाच प्रकारे सुमारे दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले होते.
फिर्यादी ब्रिजेश परशुराम सिंग (२६, रा. टाकळी रोड) यांना १९ ते २३ जुलै दरम्यान संपर्क साधून त्याने बजाज फायनान्सद्वारे वैयक्तिक कर्ज देण्याचे आमिष दाखवले. सिंग यांचा विश्वास संपादन करण्यासाठी भामट्याने त्यांना बनावट कागदपत्रे सोशल मीडियाद्वारे पाठवली. तसेच कर्ज घेण्यासाठी वेगवेगळे शुल्क द्यावे लागेल, असे सांगून भामट्याने वेळोवेळी त्यांच्याकडून २ लाख ३७ हजार ८४४ रुपयांना गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मोठी रक्कम वसूल केल्यानंतरसुद्धा कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही आणि बँकेच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम येण्याऐवजी असलेली रक्कमही गेल्याची जेव्हा खात्री पटली तेव्हा सिंग यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयित चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.