नाशिक : प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिपदाच्या काळात कधीच त्यांच्या वाहनावर लाल दिवा लावला नाही. भाजपा लाल दिवा संस्कृतीचा उगाचच बाऊ करीत आहे. राज्यापुढे लाल दिव्याच्या मुद्द्यापेक्षा कर्जमाफीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे ‘कॉपी कॅट’ मुख्यमंत्री असल्याचा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या यशापयशाचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे नाशिकला आल्या होत्या. बैठकीनंतर बोलताना त्यांनी सांगितले की, संघर्षयात्रेच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी एकत्र येत एल्गार पुकारला असून, सरकारला कर्जमाफी करावीच लागेल. दुर्दैवाने अजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहत आहेत, किती महिलांना विधवा होण्याची वाट पाहत असल्याचा आरोप केला. मी मुख्यमंत्री बोलतोय, किंवा मंत्र्यांच्या वाहनावरील लालदिवा काढून घेण्याचा निर्णय असो, आपले मुख्यमंत्री प्रत्येक बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोंदीची कॉपी करतात. त्यांच्याकडे स्वत:चे ओरिजनल असे काही नाही. हे मुख्यमंत्री कॉपी कॅट मुख्यमंत्री असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कधीकाळी संस्कृत शहराची ओळख असलेले मुख्यमंत्र्यांचे नागपूर शहर आजमितीस क्राइम कॅपिटल म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. आमदार निवासातील महिलेवर बलात्काराचा प्रकार म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. संघटनेच्या आढाव्यात महापालिका व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद यांच्यातील यशापयशाची जबाबदारी पक्षाने स्वीकारली आहे. अपयश आल्याने आत्मचिंतन जरूर करणार; मात्र कोणावरही कारवाई करणार नाही, असे सांगत त्यांनी स्थानिक नेतृत्वाचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकार परिषदेस आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, श्रीराम शेटे, विष्णुपंत म्हैसधुणे, नाना महाले, अर्जुन टिळे, रंजन ठाकरे, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लाल दिव्यापेक्षा कर्जमाफी महत्त्वाची
By admin | Published: April 22, 2017 1:26 AM