लोकमत न्यूज नेटवर्कदिल्ली : शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमुक्तीसाठी देशभरात आंदोलन उभे करण्याचा तसेच स्वामिनाथन आयोगासाठी देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र करून केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याचा निर्णय देशभरातील विविध शेतकरी नेत्यांच्या बैठकीत घषण्यात आला.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात यासाठी देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी पीस फाऊंडेशनच्या सभागृहात घेण्यात आली. त्यात सदरचा निर्णय घेण्यात आला. मंदसोर (मध्यप्रदेश) येथे गोळीबारात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना व देशभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रध्दाजंली वाहुन बैठकीस सुरूवात झाली. स्वामिनाथन आयोगासाठी देशभरात आंदोलन उभे करण्यावर यात चर्चा करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्रातुन खा. राजू शेट्टी, रविकांत तुपकर, प्रा.एच. एम. देसरडा, स्वामी अग्निवेश, दिल्लीचे योगेंद्र यादव, उत्तर प्रदेशचे व्ही. एस. म.सिंग, राजस्थानचे रामपाल जाट, कर्नाटकचे कोंडीअळी चंद्रशेखर बंगालचे माजी खासदार हल्लान मुल्लाह, महाराष्ट्रातील हंसराज वडघूले, बापूसाहेब कारंडे, योगेश पांडे वैभव इंगळे यांच्यासह २४ राज्यातील व ३४ शेतकरी संघटनाचे शेतकरी नेते उपस्थित होते.
कर्जमुक्तीचे आंदोलन आता देशभरात
By admin | Published: June 17, 2017 1:19 AM