कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने बुधवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतीमाल लिलावाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समित्यांनी गावनिहाय गट करून मध्यवर्ती ठिकाणी विक्री व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समित्यांना दिल्या आहेत मात्र व्यवहारिकदृष्ट्या ते शक्य नसल्याने सर्वच बाजार समित्यांनी उपनिबंधकांच्या पत्राला वाटाण्याच्या अक्षदा लावत आपापल्यापरिने माल खरेदी विक्रीची व्यवस्था केली आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला माल विकावयाचा आहे. त्यांनी बाजार समितीच्या अधिकृत व्यापाऱ्यांशी संपर्क साधून माल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून व्यापाऱ्यांच्या खळ्यावर बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित रहाणार असल्याने या व्यवहाराला बाजार समितीची मान्यता असणार आहे. यामुळे नाशवंत माल शेतकरी व्यापाऱ्यांपर्यंत घेऊन जात असल्याचा दावा बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कोट-
बाजार समितीचे विकेंद्रीकरण शक्य नसल्याने मुख्य आवारात कामकाज बंद असले तरी व्यापाऱ्यांच्या खळ्यावर बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शेतीमाल विक्रीचे व्यवहार होत आहेत. व्यापाऱ्यांच्या खळ्यावर कांदा येत आहे. - अशोक देसले, सचिव, मालेगाव बाजार समिती
कोट-
लॉकडाऊनमध्ये फक्त भाजीपाला आणि लाल कांदा यांचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर माल विक्रीची व्यवस्था केलेली असल्यामुळे फारसी समस्या निर्माण होणार नाही. हा व्यावहार पूर्णपणे रोख स्वरूपात असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. - सुवर्णा जगताप, चेअरमन, लासलगाव बाजार समिती
कोट-
नाशिक बाजार समितीला विकेंद्रीकरण करणे शक्य नाही. शिवाय व्यापाऱ्यांकडेही मोठ्या जागा नसल्यामुळे मालाची पॅकिंग आणि इतरही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे बाजार समितीचे व्यावहार बंदच आहेत. काही व्यापारी शिवार खरेदी करत आहेत. मुख्य आवार सोडून दुसरीकडे जागा घेतली तर तेथेही गर्दी होऊ शकते. शिवाय हमाल, मापारी, इतर कर्मचारी यांचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. - अरुण काळे, सचिव, नाशिक बाजार समिती