नाशिक : आडगाव ग्रामस्थांचा विरोध झुगारून सुरू करण्यात आलेल्या म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेचे काम करताना ठेकेदाराने दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडल्याने आडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडून ठेकेदाराचा अतिक्रमण करण्याचा डाव असल्याचा आरोप करत काम बंद करण्याची मागणी केली आहे.आडगावी म्हाडा प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे दीड वर्षापूर्वी हा वाद चांगलाच गाजला होता. प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता, पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून कामाला सुरुवात करण्यात आली. आता हा बहुचर्चित प्रकल्प पूर्णत्वास येत असताना आडगाव म्हाडा प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या जागेत दशक्रिया शेड आहे. त्या दोघांच्या मध्ये कंपाउंड असताना ते अचानक तोडून पुन्हा कंपाउंड बांधण्याचा अट्टाहास केला जात आहे. ठेकेदाराच्या या कृतीवर संशय घेत, ग्रामस्थांनी काम बंद पाडले. मात्र ग्रामस्थ माघारी फिरताच पुन्हा कंपाउंड तोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, पुन्हा आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे.सदरचा प्रकार म्हणजे दशक्रिया शेडच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आडगावच्या नागरिकांनी कंपाउंड कामाला विरोध सुरू केला आहे. पूर्वी कंपाउंड असताना तोडण्याची गरज काय, असा सवाल करत म्हाडाने कंपाउंडला लागून भिंत बांधावी, अशी मागणी केली आहे. यावेळी आडगाव पोलीस पाटील एकनाथ मते, शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, नितीन माळोदे, सुरेश मते, बालाजी माळोदे, पोपट शिंदे, विलास माळोदे, मयूर मोरे आदी उपस्थित होते.
दशक्रिया विधीचे कंपाउंड पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:06 AM