नाशिक : विवाह समारंभ हा मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी मानला जातो, त्यामुळे बहुतांश समाजामध्ये विवाह समारंभावर मोठा खर्च करण्यात येतो. समाजातील काही परिवारांमध्ये चुरस म्हणून इतरांपेक्षा जास्त डामडौल दाखविण्यासाठी लग्नकार्यात अमर्याद आणि अनावश्यक खर्च केला जातो. रूढी-परंपरांचा पगडादेखील या खर्चाला कारणीभूत ठरून त्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. परंतु रूढी-परंपरांना फाटा देत लग्नकार्य साधेपणाने करण्याची नवीन प्रथा रूढ होत आहे. अशाप्रकारचे ठरावच समाजातील अधिवेशन किंवा बैठकांमध्ये घेण्यात येत आहेत. विशेषत: आहेर, हुंडा, मानपान या प्रथा टाळण्याचा निर्णय घेतला जात आहे . विवाह समारंभात काही कुटुंब रूढी-परंपरांच्या नावाखाली अनावश्यक खर्च करतात. त्याचा आर्थिक भुर्दंड लग्न करणाऱ्या परिवाराला बसतो. विशेषत: वधूपित्याला हुंडा, मानपान आहेर यासाठी कर्ज काढून खर्च करावा लागतो. हे टाळण्यासाठी अनेक सामाजिक समाजामध्ये प्रबोधन घडत आहे. लाड शाखीय वाणी समाजाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात विवाहाचा खर्च वधू-वर या दोन्ही पक्षांनी करावा, हुंडा घेऊ नये आणि देऊ नये, आहेर देण्याची पद्धत बंद करावी, असा निर्णय बैठकांमध्ये घेण्यात आला आहे.डीजेवर बंदीनाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील माळी व मराठा समाजातील काही कुटुंबांनी लग्नातील मानपानावरील खर्चाला फाटा देत मुलींची शाळा, वसतिगृह व आदिवासी सामाजिक संघटनांना मदत केली आहे. तसेच लग्नपत्रिका छापून गावोगाव वाटप करण्याची प्रथा बंद केली जात असून, त्याऐवजी मोबाइलद्वारे संदेश पाठविण्यात येत आहेत. तसेच काही गावांत विवाह समारंभातील डिजे वाजविण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.
विवाहातील कालबाह्य रूढींना फाटा देण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:59 PM