नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत दैनंदिन विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येतो. नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा, डाळिंब, आंबा विक्रीला येतो.
बाजार समितीत रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाऊन केले. यात बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. बाजार समिती बंदमुळे शेतमाल नाशवंत होण्याची शक्यता असल्याने त्याची विल्हेवाट लावायची कशी, असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते. यातून मार्ग काढण्यासाठी सभापती पिंगळे यांनी पालकमंत्री भुजबळ, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्ह्यातील अन्य बाजार समित्यांनीही असाच आग्रह धरण्यास सुरुवात केल्याने नाशिक बाजार समितीचा निर्णय काही तासांतच मागे घेण्यात आला आहे. तालुक्यातील गिरणारे येथे उपबाजार सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले.