संजय पाठक, नाशिक- शिवसेनेचे तब्बल पंचवीस वर्षे आमदार राहिलेल्या माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नाराजीबाबत खासदार संजय राऊत यांनी त्यांना पाचारण करून भूमिका जाणून घेतली. त्यानंतर खासदार राऊत हे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून त्यांनतर दोन दिवसात ते निर्णय कळवणार आहेत. दोन दिवसात ते काय निर्णय कळवतात यावर आपली पुढील भूमिका राहील असे बबनराव घोलप यांनी सांगितले.
घोलप यांनी वॉटस अपवर उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांनी सोमवारी (दि.११) मुंबईत बोलवले होते. त्यानुसार घोलप हे तेथे जाऊन आले. त्यानंतर आता दोन दिवसांनी योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितले.
शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री बबनराव घेालप इच्छूक होते त्यानुसार उध्दव ठाकरे यांनी त्यांना तयारीला लागण्याची सूचना केली होती असे घोलप यांचे म्हणणे आहे. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी शिवसेना सेाडून गेलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे घोलप नाराज झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांपूर्वी घोलप शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या मंत्रीपदावरून हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी माजी आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यातच उध्दव ठाकरे यांच्या नगर दौऱ्याचे निमंत्रण आपल्याला देण्यात आले नाही आणि वाकचौरे यांना पक्षाचे सचिव मिलींद नार्वेकर पुढे पुढे करीत असल्याचे दिसून आल्याने नाराज घोलपांनी उपनेतेपदाचाही राजीनामा दिला होता.