नाशिक: जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता मिळावी, या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या टास्क फेार्समध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील सोमवारपासून नाशिककरांना दिलासा मिळणार की निर्बंध कायम राहणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
गेल्या २३ तारखेला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या काेरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबतची चर्चा झाली होती. निर्बंधात शिथिलता मिळावी, अशी मागणी अनेक व्यापारी संघटनांसह व्यावसायिकांकडून होत असल्याने, त्यांच्या मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यावेळी राज्य शासनाकडे शिथिलतेबाबत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्याने, शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी किंवा दुकानांची वेळ एक तासाने वाढवून तरी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या टास्क फोर्सकडे पाठविला आहे. या पथकाची गुरुवारी मुंबईत बैठक होणार असून, शिथिलता देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली, तर पुढील सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन असल्याने, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दुकाने बंद ठेवली जातात. या दोन्हीपैकी एक दिवस दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी किंवा बाजारपेठेतील दुकानांची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी वाढवून द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधात शिथिलता देण्याचा अधिकार हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या टास्क फोर्सला असल्याने, त्यांच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून असणार.
--इन्फो--
एखादा तास दिलासा शक्य
वीकेंड लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने, जिल्ह्यातील वीकेंड लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता आहे, परंतु काहीशी शिथिलता देण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सायंकाळी ४ ऐवजी ५ वाजेपर्यंत होऊ शकते. टास्क फोर्स नेमका काय निर्णय घेणार, यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.